इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे संस्थापक इमरान खान यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने तीन वर्षांपासून अदियाला तुरुंगात असलेल्या इमरान खान यांना पुढील सुनावणीपर्यंत शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या उपचारांची आणि वैद्यकीय तपासण्यांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) हा आदेश देताना इमरान खान यांच्या उपचारांसाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. रुग्णालयाबाहेर कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचेही न्यायालयाने अधिकाऱ्यांना बजावले.
न्यायमूर्ती शाहिद वहीद यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्याची तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्याच्या मागणीसंदर्भातील याचिकांवर हा निर्णय दिला. इमरान खान यांच्या कुटुंबीयांकडून दीर्घकाळापासून ही मागणी केली जात होती. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने इमरान खान यांना कुटुंबातील सदस्यांची दर आठवड्याला भेट घेण्याची परवानगी देण्याचेही आदेश दिले आहेत. याशिवाय, न्यायालयाने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या मंडळात इमरान खान यांचे खासगी डॉक्टर आणि त्यांची बहीण उझमा खान यांचा समावेश असेल.न्यायालयाने इमरान खान यांच्या वकिलांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.