रेवंत रेड्डींच्या अमेरिका दौऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाची मंजुरी नाही

0

‘पद आणि दौऱ्याच्या उद्देशाशी सुसंगत नसल्याचे’ कारण; ब्रिटन दौऱ्याला हिरवा कंदील

नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या पदाला आणि प्रस्तावित दौऱ्याच्या उद्देशाला कार्यक्रम सुसंगत नसल्याचे कारण मंत्रालयाने दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांचे मूल्यांकन इतर मान्यवरांच्या दौऱ्यांप्रमाणेच राजकीय मंजुरीसाठी केले जाते. प्रस्तावित कार्यक्रम हा संबंधित पद आणि दौऱ्याच्या उद्देशाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या प्रस्तावित दौऱ्याच्या बाबतीत ही अट पूर्ण होत नसल्याने मंजुरी देण्यात आलेली नाही, असे जायसवाल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या ब्रिटन दौऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. निश्चित कार्यक्रमानुसार रेड्डी हे ‘तेलंगणा रायझिंग’ प्रतिनिधीमंडळासोबत २० ऑगस्टपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार त्यांना २३ ऑगस्ट रोजी ब्रिटनहून अमेरिकेला रवाना व्हायचे होते. मात्र, अमेरिका दौऱ्याला मंजुरी न मिळाल्याने ते आता लंडनहून थेट हैदराबादला परतणार आहेत.
विद्यापीठांसोबत सामंजस्य कराराची योजना अमेरिका दौऱ्यात हार्वर्ड, एमआयटीसह इतर विद्यापीठांसोबत जागतिक शैक्षणिक भागीदारीअंतर्गत सामंजस्य करार (MoU) करण्याची रेड्डी सरकारची योजना होती. मात्र, केंद्राची मंजुरी न मिळाल्याने हा दौरा रद्द झाला आहे. नियमानुसार मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. तेलंगणा सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या ब्रिटन आणि अमेरिका दौऱ्याबाबत केंद्र सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी केवळ ब्रिटन दौऱ्याला मंजुरी मिळाली, तर अमेरिकेच्या दौऱ्याला मंजुरी देण्यात आलेली नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech