सोने-चांदी दरात पुन्हा उसळी

0

सोन्याच्या दरात ₹४,५०० तर चांदीत ₹११ हजारांची वाढ; खरेदीदार संभ्रमात

जळगाव : सोन्यासह चांदीच्या दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली असून, आज सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले असून, खरेदीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सोने-चांदीच्या दरात काहीशी घट झाली होती. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू झाले आहे. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा भाव १ लाख ५७ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव २ लाख ४८ हजार रुपये प्रति किलो झाला आहे. हे दर जीएसटी वगळून आहेत.

जागतिक घडामोडींचा परिणाम
सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्याची स्थिती, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोने-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत.
दरातील अनिश्चिततेमुळे ग्राहकही सावध झाले आहेत. भविष्यात दर कमी होतील, या अपेक्षेने काही ग्राहकांनी दागिने खरेदी पुढे ढकलली आहे. तर दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ग्राहक सध्याच्या दरातच खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.
सोन्या-चांदीच्या दरातील या चढ-उतारामुळे आगामी काळात बाजारातील ग्राहकांचा कल आणि जागतिक आर्थिक घडामोडी याकडे सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech