नवी दिल्ली : कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) यांनी बांधणी केलेली ‘मंगरोल ही ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ श्रेणीतील तिसरी नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या नौकेत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी बनावटीच्या सामग्रीचा वापर करण्यात आला असून, ती पाण्याखालील भागाची टेहळणी, किनारपट्टीलगतच्या भागातील पाणबुडीरोधक युद्ध मोहिमा, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (एलआयएमओ) आणि सुरुंग-रोधक (माइन वॉरफेअर) कारवाया करण्यासाठीच्या साधनांनी सुसज्ज आहे. ही नौका ‘वॉटरजेट्स’वर चालणारी असून अत्याधुनिक पाणतीर (टॉर्पेडोज), पाणबुडीविरोधी रॉकेट्स तसेच प्रगत रडार आणि सोनार प्रणालींनी युक्त आहे.
गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील ‘मंगरोल’ या किनारी शहर आणि लहान बंदराचे या नौकेला नाव देण्यात आले आहे; हे बंदर सागरी मत्स्यव्यवसायाचे एक प्रमुख केंद्र आहे. तसेच, ‘आयएनएस मंगरोल’ या नौकेत या पूर्वी २००४ पर्यंत भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या ‘माइनस्वीपर’ या जहाजातील सुविधांचा वारसाही सामावलेला आहे. आणि अशा रितीने, महत्त्वपूर्ण युद्धनौकांची नावे जतन करण्याची नौदलाची परंपरा या नवीन नौकेच्या रुपाने कायम राखली गेली आहे. ‘मंगरोल’चे हस्तांतरण हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, तो सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब करणारा आहे. हे जहाज स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थेची वाढती क्षमता दर्शवणारे उत्तम उदाहरण आहे.