गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा – उपमुख्यमंत्री शिंदे

0

मुंबई : गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी नियोजन केले असून मंडळांच्या सूचनांचाही त्यात समावेश करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील सुमारे १ हजार ८५० किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी देण्याबाबतही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलीस किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी. मोठ्या मूर्तींची वाहतूक करताना मूर्तीची रचना, नट-बोल्ट, वेल्डिंग आणि अन्य जोडणी सुरक्षित असल्याची खात्री करावी. आगमन आणि विसर्जनावेळी लहान मुले तसेच भाविकांना मूर्तीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (दूरदृश्यप्रणालीद्वारे), गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, तसेच मंत्रालय, मुंबई महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech