नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारवर कथित “कॅश फॉर ट्रान्सफर” घोटाळ्यावरून टीका केली आहे. पक्षाने आरोप केला की, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत असे तथ्य समोर आले आहेत, ज्यावरून पंजाबमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या कथितपणे “रेट कार्ड”च्या आधारे केल्या जात असल्याचे संकेत मिळतात. भाजप मुख्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यकाळात ट्रान्सफर-पोस्टिंगसाठी कथितपणे निश्चित दर होते आणि या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. गौरव भाटिया यांनी सांगितले.
दरम्यान गौरव भाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या चौकशीत मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी राजबीर सिंह घुम्मन यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी आरोप केला की, विविध विभागांमध्ये नियुक्ती आणि बदल्यांसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले होते. त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना सवाल केला की, जर दखलपात्र गुन्हा समोर आला आहे, तर आतापर्यंत एफआयआर का दाखल करण्यात आली नाही. स्पष्ट आहे की, या प्रकरणात मध्यस्थांना संरक्षण दिले जात आहे. त्यांनी दावा केला की, दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रमाणेच पंजाबमध्येही “रेट कार्ड मॉडेल” लागू करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे कथित “कॅश फॉर ट्रान्सफर” घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे आणि या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, पंजाबच्या जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.