विदर्भासह राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

0

मुंबई : राज्यात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भासह राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ओडिशाहून पश्चिमेकडे सरकणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रादरम्यान तयार झालेली वाऱ्याची द्रोणीय रेषा यामुळे हवामानात बदल होणार आहे. दोन सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, तीन ते पाच सप्टेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, संपूर्ण सप्टेंबर महिन्यात विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या लगतच्या काही भागांचा अपवाद वगळता, विदर्भातील बहुतांश भागात पावसाची कमतरता राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेली पावसाची तूट सप्टेंबरमधील पावसामुळे पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण विदर्भात सुमारे २२ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये ही तूट ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, सप्टेंबरच्या एकूण अंदाजामुळे पावसाची तूट कितपत भरून निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech