मलेरिया प्रतिबंधात्मक औषध घेतल्याने ५३ विद्यार्थी रुग्णालयात

0

आंध्रप्रदेशच्या पोलावरमच्या गोल्लागुप्पा गावात एका ७ वर्षीय बालिकेचा मृत्यू

भद्राचलम : आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यातील गोल्लागुप्पा गावात मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्लोरोक्विनच्या गोळ्या दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिणाम जाणवून त्यांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली. या घटनेत एका ७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून ५३  जण आजारी पडले आहेत. त्यापैकी २०  विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भातील माहितीनुसार गोल्लागुप्पा येथे गेल्या शुक्रवारी एका विद्यार्थिनीचा मलेरियामुळे मृत्यू झाल्यानंतर स्थानिक आरोग्य विभागाने आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी सरकारी शाळा आणि अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देण्यात आल्या. औषध घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या, अस्वस्थता आणि इतर त्रास सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीच्या इयत्तेत शिकणारी ७ वर्षीय मादिवी जमुना हिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला लक्ष्मीपुरम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्राचलम येथे हलविण्यात आला आहे.

दरम्यान, आजारी विद्यार्थ्यांना भद्राचलम येथील शासकीय क्षेत्रीय रुग्णालयात तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजशेखर रेड्डी यांच्यासह वैद्यकीय पथके विद्यार्थ्यांवर उपचार करत आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असली तरी सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची स्थिती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. घटनेची माहिती मिळताच चिंतूर आयटीडीएचे प्रकल्प अधिकारी शुभम नोखवाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. हेमंत कुमार यांनी रुग्णालयात धाव घेतली. काकीनाडा शासकीय सर्वसाधारण रुग्णालयातील ९ सदस्यीय तज्ज्ञ पथक गावात दाखल झाले असून बालरोगतज्ज्ञांसह विशेष वैद्यकीय पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

क्लोरोक्विनच्या सेवनानंतर विद्यार्थ्यांना नेमका कोणता प्रतिकूल परिणाम झाला आणि विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण काय, याचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश देत बाधित विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले असून बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech