इस्तंबूलजवळ मारमारा समुद्रात दोन जहाजांची भीषण टक्कर; १० क्रू सदस्य बेपत्ता

0

अंकारा :  इस्तंबूलमधील सिलिव्हरी जिल्ह्याजवळ बुधवारी पहाटे मारमारा समुद्रात तुर्कीचा ध्वज असलेल्या दोन व्यावसायिक जहाजांची भीषण टक्कर झाली.या दुर्घटनेनंतर एका बल्क कॅरिअर जहाजाच्या बुडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्यावरील १० क्रू सदस्य बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मदत आणि बचावकार्यासाठी तुर्की तटरक्षक दलाची १४ जहाजे आणि एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ३ वाजता जवळपास ३,००० टन इंजिन ऑइल घेऊन जाणारे ‘अल्सू’ हे केमिकल टँकर आणि ४,२०० टन कॉइल्ड स्टीलने भरलेले ‘टुगबेर्क इमामोग्लू’ हे बल्क कॅरिअर एकमेकांना धडकले. ‘टुगबेर्क इमामोग्लू’ हे काळ्या समुद्रातील करादेनिझ एरेग्ली बंदराच्या दिशेने जात होते, तर ‘अल्सू’ एजियन समुद्रातील अलियागा बंदराकडे निघाले होते.

तुर्कीच्या सागरी व्यवहार प्राधिकरणानुसार, बचाव केंद्राला पहाटे ३.२६ वाजता ‘टुगबेर्क इमामोग्लू’ जहाजाकडून आपत्कालीन सिग्नल मिळाला. त्यानंतर १५ मिनिटांनी ‘अल्सू’च्या कॅप्टनने दुर्घटनेची माहिती दिली. दुर्घटनेनंतर ‘टुगबेर्क इमामोग्लू’ किंवा त्यावरील १० क्रू सदस्यांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. रेडिओ कॉल्स आणि मोबाइल फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने अधिकाऱ्यांनी जहाज बुडाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.इस्तंबूलच्या राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अल्सू’ या टँकरचे मोठे नुकसान झालेले नाही. इस्तंबूल चेंबर ऑफ मेरीटाइम कॉमर्सनुसार, ‘टुगबेर्क इमामोग्लू’ हे झेबे डेनिजसिलिक या कंपनीच्या मालकीचे आहे, तर ‘अल्सू’चे संचालन ओझपुलाथाने डेनिज तासिमासिलिगीकडून केले जाते. बेपत्ता क्रू सदस्यांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech