अमेरिकेची महाकाय युद्धनौका थायलंडमधील पट्टायात; ५ हजार सैनिकांच्या आगमनाने प्रशासन सतर्क

0

बँकॉक :  थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटन शहर पट्टाया सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अमेरिकन नौदलाची विशाल विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ बुधवारी सकाळी पट्टायाजवळील लाम चाबांग बंदरात दाखल झाली असून, तिथे तिने नांगर टाकला आहे. मात्र, या युद्धनौकेच्या आगमनापूर्वीच स्थानिक प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था कडक केली होती. या जहाजावरील सुमारे ५,००० अमेरिकन नौसैनिक आणि मरीन कमांडो पट्टायात दाखल झाले आहेत. समुद्रात २०० हून अधिक दिवस घालवल्यानंतर या सैनिकांना विश्रांतीची संधी मिळाली आहे. मात्र, या व्हीआयपी दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैनिकांच्या आगमनाची बातमी समोर येताच पट्टाया पोलिस पूर्णपणे सतर्क झाले. शहराच्या मध्यवर्ती भागासह नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी नुकतीच वीकेंडला छापेमारी करून वेश्याव्यवसायात सहभागी असल्याच्या संशयावरून सुमारे ४० ते ५० जणांना ताब्यात घेतले आहे.
पट्टायाचे पोलीस प्रमुख अनेख स्राथोंगयू यांनी स्पष्टपणे मान्य केले की, अमेरिकन सैनिकांच्या आगमनानंतर सेक्स ट्रेडवर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान ठरत आहे. ते म्हणाले की, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत; मात्र, अनेकदा सेक्स वर्कर्स अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांशी संपर्क साधतात, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण होते.

थायलंडमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीरदृष्ट्या बेकायदेशीर असला तरी पट्टायामध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, पट्टायातील व्यावसायिक आणि महापौर मात्र अमेरिकन सैनिकांच्या आगमनामुळे आनंदित आहेत. शहराची अर्थव्यवस्था दीर्घकाळापासून पर्यटन आणि मनोरंजन उद्योगावर अवलंबून आहे. पट्टायाचे महापौर पोरामासे गंपिचेस यांच्या अंदाजानुसार, प्रत्येक अमेरिकन सैनिक दररोज सुमारे ३० ते ९१ अमेरिकी डॉलर खर्च करू शकतो. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि दुकाने चालवणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. सैनिकांना एकाच वेळी सुट्टी न देता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विश्रांती दिली जाणार असल्याने स्थानिक व्यवसायांना अनेक दिवस याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, पट्टाया आणि अमेरिकन सैनिकांचे जुने नाते आहे. एकेकाळी हे ठिकाण छोटेसे मच्छीमारांचे गाव होते. मात्र, व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकन सैनिक विश्रांती आणि मनोरंजनासाठी येथे येऊ लागल्यानंतर पट्टायाचा विकास आणि प्रसिद्धी झपाट्याने वाढली.दरम्यान, सुमारे दशकभरापूर्वी एफबीआयने पट्टायाला जगातील सर्वात मोठ्या सेक्स टुरिझम डेस्टिनेशन्सपैकी एक म्हटले होते.
‘यूएसएस अब्राहम लिंकन’चा हा दौरा आणखी एका कारणामुळे विशेष ठरत आहे. या युद्धनौकेने आधुनिक इतिहासातील प्रदीर्घ सागरी मोहिमांपैकी एक पूर्ण केली आहे. हे जहाज गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सॅन डिएगोहून रवाना झाले होते. त्यानंतर इराणसोबत वाढलेला तणाव आणि पश्चिम आशियातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याची तैनाती करण्यात आली.सलग २०० हून अधिक दिवस समुद्रात राहिल्यामुळे अमेरिकन डेमोक्रॅटिक खासदारांनीही सैनिकांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.

दीर्घ आणि थकवणाऱ्या तैनातीमुळे काही काळापूर्वी नौसैनिकांमध्ये मानसिक तणाव आणि आत्महत्येच्या प्रयत्नांच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता या सैनिकांना विश्रांतीची संधी देण्यात आली आहे.सध्या सुमारे ५,००० अमेरिकन सैनिकांच्या स्वागतासाठी पट्टाया सज्ज झाले आहे. दुसरीकडे, कोणताही अनपेक्षित वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांनीही कंबर कसली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech