जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागताना प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यासंदर्भातील हमीपत्रही पोलिसांना दिले होते. मात्र, यापूर्वी मुंबईत झालेल्या त्यांच्या आंदोलनाचा अनुभव लक्षात घेता यावेळी परवानगी नाकारण्यात आली आहे. मागील आंदोलनावेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते.
मागील वेळी आझाद मैदानावर पाच हजार आंदोलक उपस्थित राहतील, या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या संख्येपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाल्याचा दाखला पोलिसांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे पुन्हा त्याचप्रकारची परिस्थिती निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी होते. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे होणाऱ्या मोठ्या गर्दीचा परिणाम या सुरक्षा व्यवस्थेवर होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यास ठाम असल्याचा इशारा दिला आहे. तसेच ‘गतवर्षी परवानगी दिली होती, आता कशी नाकारण्यात आली’, असा सवाल करत ‘सरकार न्यायदेवतेचा निर्णय पायदळी तुडवतोय. आम्हाला आंदोलनापासून रोखता येणार नाही, १९ तारखेचं आंदोलन होणारच’ असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबर (मंगळवार) रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. पाटोदा, अहिल्यानगर, हडपसर, खोपोली, कोपरखैरणेमार्गे १९ सप्टेंबर रोजी ते मुंबईत दाखल होणार आहेत.