मुंबई : देशात २०२९ पूर्वी १९ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप सरकारने रक्ताचा एकही थेंब न सांडता कलम ३७० हटवलं आहे. देशात घुसखोरी करणाऱ्यांना शोधून देशाबाहेर काढणार, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. देशातील माओवादाचा पूर्ण खात्मा करून देशाला माओवादापासून मुक्त केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची १९ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता आहे. यामध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांचा समावेश आहे. उत्तराखंड, गुजरात आणि आसाममध्ये युसीसी आधीच लागू करण्यात आला आहे, तर मध्य प्रदेशमध्ये युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
तिहेरी तलाक रद्द करण्यात आला असून मुस्लिम महिलांना समान अधिकार देण्यात आले आहेत. त्यापुढे जात आम्ही अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू केला आहे. मला खात्री आहे की, २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या मोहिमांमुळे दहशतवादाबाबत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण प्रस्थापित झाले आहे, तसेच विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे, असा पुन्नरुच्चारही शाह यांनी केला.
सरकारने भारतीय न्याय संहितेद्वारे देशाची फौजदारी न्याय व्यवस्था बळकट केली आहे. अनेक राज्यांमध्ये एका वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. तीन वर्षांच्या आत न्याय मिळवून देणे सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा उभारली जात आहे. कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याची प्रक्रिया एकही थेंब रक्त न सांडता किंवा एकही गोळी न झाडता पूर्ण करण्यात आली आणि काश्मीर आता भारताशी पूर्णपणे एकरूप झाला आहे. सरकारने पाच दशकांपासून चालत आलेला नक्षलवाद संपवला आणि देशाच्या ईशान्य भागात १४ हून अधिक शांतता करार केले. ९,००० हून अधिक लोकांनी शरणागती पत्करली आहे आणि आज आम्ही ईशान्य भारताला विकासाच्या मार्गावर नेले आहे.
जेन झीच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे सामाजिक आणि राजकीय परिणामबाबत बोलताना ते म्हणाले, आपण लोकशाहीत आहोत. विविध मुद्द्यांवर लोकांची मते भिन्न असू शकतात आणि ती मते मांडली जाणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, पण आम्ही आणीबाणी लादून राज्यकारभार करू शकत नाही. ती काँग्रेसची संस्कृती आहे, आमची नाही. आमचा संवाद आणि चर्चेवर विश्वास आहे, असेही अमित शाह म्हणाले.