आकडेवारी नको, प्रत्यक्ष पंचनामा करा….; पीकविमा, NDRFमधून तातडीची मदत देण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश
पावसातील खंडाने भात, नाचणीसह खरीप पिकांना फटका; नुकसानाची वस्तुनिष्ठ नोंद करण्याच्या सूचना
(अनंत नलावडे )
मुंबई : कोकणातील पावसाच्या खंडाने भात, नाचणीसह खरीप पिकांवर परिणाम झाल्याने आता सरकारने कागदावरील आकडेवारीऐवजी थेट शेताच्या बांधावर जाऊन पीकस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत. पिकांचे नुकसान, पावसातील खंड आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम याची वस्तुनिष्ठ नोंद करून पीकविमा, NDRF तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने मदत मिळवून देण्याच्या सूचना मंगळवारी थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.
सीबीडी बेलापूर येथील सिडको सभागृहात कोकण विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कृषिमंत्र्यांनी महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरून नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश दिले.
शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित शेतीशी जोडलेले असल्याने केवळ पर्जन्यमानाची आकडेवारी पाहून परिस्थितीचे मूल्यमापन करू नये, असेही भरणे यांनी आवर्जून स्पष्ट केले. पिकांना गरजेच्या काळात किती पाऊस झाला, पावसात किती खंड पडला आणि त्याचा पिकांवर नेमका काय परिणाम झाला, याची नोंद घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पीकविम्याचा लाभ वेळेत मिळवा…..
पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि संबंधित कार्यवाही पीक परिस्थितीनुसार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF तसेच शासनाच्या विविध योजनांतून उपलब्ध होणारी मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने सक्रियपणे काम करावे, असेही भरणे यांनी सांगितले.त्याचवेळी शासकीय योजनांची माहिती प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्याला प्रत्यक्ष लाभ मिळतो आहे की नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नाकडेही लक्ष…..
पीक नुकसानीबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता याकडेही प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. ज्या भागात गरज आहे, तेथे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गासाठी स्वतंत्र विचाराची मागणी….
मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असल्याचे सांगत पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली.आंबा आणि काजू या पिकांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यंदाची परिस्थितीही गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.कोकणाची भौगोलिक आणि कृषी परिस्थिती इतर भागांपेक्षा वेगळी असल्याने नुकसानभरपाईचे निकष स्वतंत्रपणे विचारात घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत द्यावी, अशीही मागणी राणे यांनी केली.
“पंचनाम्यात हलगर्जीपणा नको”……
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची सूचना केली. महसूल आणि कृषी विभागातील तालुका व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी.तसेच पंचनाम्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.कोकणातील बहुतांश शेतकऱ्यांकडे लहान भूधारणा आहेत.त्यातही भात पिकावर पावसातील खंडाचा परिणाम झाला असून पाने पिवळी पडणे आणि विविध किडींचा प्रादुर्भाव याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तीन दिवसांत प्रस्ताव…..
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी पावसाचे एकूण प्रमाण नव्हे, तर पिकांच्या गरजेच्या काळातील पाऊस आणि प्रत्यक्ष पीकस्थिती याचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून ट्रिगर तपासावेत आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव तीन दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत सादर करावेत, असेही निर्देश देण्यात आले.त्याचवेळी
पीक परिस्थितीनुसार पीक कापणी प्रयोगांचे वेळापत्रक निश्चित करून तेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पाच जिल्ह्यांची परिस्थिती समोर….
बैठकीत ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पीक परिस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. पर्जन्यमान, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, संभाव्य नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री भरत गोगावले, नितेश राणे, आमदार मंदाताई म्हात्रे, सुलभा गायकवाड, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.