मुंबई : चतुरस्र अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक – मुख्यमंत्री
भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. नटसम्राट नानांची अशी आकस्मिक एक्झिट धक्कादायक आहे, अशी शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी घेतलेली भूमिका कलाक्षेत्रासह, अनेकांना सामाजिक बांधिलकीचा धडा घालून देणारी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी नानांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनाच्या वेळेस झालेली भेट ही शेवटची ठरली, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करताना नानांच्या आठवणींना उजाळा दिला.
भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी – नितीन गडकरी
भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले – शरद पवार
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले. कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून शोक व्यक्त
ज्येष्ठ अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला आणि अत्यंत दुःख झाले. नाट्यसृष्टी तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय प्रवासामुळे, तसेच त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे आणि अद्वितीय कलाशैलीमुळे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर एक अमिट छाप पाडली आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, चाहते आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी यांच्याप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. ओम शांती. कला, संस्कृती आणि सामाजिक चळवळीची ही कधीही भरून न निघणारी हानी.