महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्येच उन्हाचा तडाखा; अमरावतीत पारा ३९ अंशांवर

0

पुणे : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून, राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी अधिक नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच नागरिकांना एप्रिल-मे महिन्याप्रमाणे उष्णतेचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ येथे ३८.२ अंश, अकोला येथे ३७.९ अंश, तर जळगाव, सोलापूर आणि वर्धा येथे प्रत्येकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

चंद्रपूरमध्ये ३७.२ अंश, अहिल्यानगरमध्ये ३६.३ अंश आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. सांगली येथे ३५ अंश, सातारा येथे ३५.७ अंश आणि कोल्हापूर येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. नाशिकमध्ये ३५.४ अंश, परभणीत ३५.६ अंश, तर धाराशिव आणि उदगीर येथे अनुक्रमे ३४.२ आणि ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रूझ येथे ३५.४ अंश, रत्नागिरी येथे ३७.५ अंश, तर महाबळेश्वरमध्ये तुलनेने कमी म्हणजे २७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. पुण्यात यंदाच्या मान्सून हंगामात ७१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असतानाही उष्णतेचा त्रास जाणवत आहे.

पावसाळ्यानंतर आकाश निरभ्र राहणे, पावसाचा अभाव आणि जमिनीवर पोहोचणाऱ्या सौर प्रारणाचे प्रमाण वाढणे ही तापमान वाढण्यामागील संभाव्य कारणे असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे मत आहे. देशाच्या काही भागांमध्येही ऑक्टोबरच्या सुरुवातीला कमाल तापमान अधिक नोंदविण्यात आले. राजस्थानमधील जैसलमेर येथे ३ ऑक्टोबर रोजी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ६ ऑक्टोबर रोजी पिलानी येथे पारा ३९.३ अंशांपर्यंत पोहोचला. ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत असून, पुढील काही दिवसांतील तापमानातील बदल आणि हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech