नोएडाच्या जेवर विमानतळाचे ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामांतर

0

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने आज, शुक्रवारी एका महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर विमानतळाचे नाव बदलण्याची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या निर्णयानुसार, जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. योगी आदित्यनाथ म्हणाले, “नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला महत्त्वाची भेट दिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. भविष्यात हे विमानतळ उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठे विमानतळ आणि देशातील प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनेल.”ते पुढे म्हणाले, “त्यामुळे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा-जेवर’ असे ठेवण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.”

मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “केंद्र आणि राज्यातील दुहेरी इंजिन सरकारच्या प्रभावी समन्वयामुळे उत्तर प्रदेश अभूतपूर्व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०१७ पूर्वी राज्याला प्रशासकीय दिरंगाई, नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना आणि मूलभूत सुविधांच्या अभावासारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता, हे सर्वश्रुत आहे.” ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि दूरदृष्टी यांपासून प्रेरणा घेत उत्तर प्रदेशने प्रशासनाची नवी कार्यसंस्कृती स्वीकारली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश नव्या आत्मविश्वासाने सर्वांगीण विकासाची नवी शिखरे गाठत आहे. राज्याच्या विकासाला सातत्याने प्राधान्य दिल्याबद्दल उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे उत्तर प्रदेश जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्थेचा आदर्श बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्च करून २,४८३ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले असल्याची माहितीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech