राज्यात १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा

0

मुंबई : पावसाळा संपताच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला असून, मुंबईसह कोकण आणि विदर्भात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांत १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. अनेक शहरांमधील तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. उत्तर कोकणातील काही भागांत उष्णतेसोबत दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. त्यानंतरही तापमानात १ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भात ऑक्टोबर हिटचा तडाखा
विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून, नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, काही भागांत पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचला आहे. मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर नागपूर शहरात ऑक्टोबर हिटचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ३५ अंशांच्या पुढे असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech