दिल्ली विमानतळावर उतरण्यापूर्वीच सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात

0

यूट्यूबर ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी दिल्लीला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सीजेपीच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत जंतर-मंतरवर जाण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीस सतर्क आहेत. आज जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपके, सौरभ आणि रांका हे मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावर त्यांना विमानातून उतरू देण्यात आले नाही. त्याच ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अभिजीत यांनी आपण येथे अटक होण्यासाठीच आलो असल्याचे सांगितले. त्यावर दिल्ली पोलिसांच्या जवानांनी, “नाही, ही अटक नाही. कृपया सहकार्य करा,” असे त्यांना सांगितले.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आज नियोजित आंदोलनापूर्वी नुकतेच जर्मनीहून परतलेल्या प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यालाही ताब्यात घेतले. हरियाणातील गुरुग्राम येथील त्याच्या निवासस्थानावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलीस सकाळी सुमारे ७ वाजून ४८ मिनिटांनी सेक्टर ५६ येथील सेंट्रल पार्क विहारमधील त्याच्या घरी दाखल झाले. याच ठिकाणी ध्रुव राठीचे कुटुंब राहते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीपासूनच दिल्ली पोलिसांचे सुमारे ५० जवान साध्या वेशात त्याच्या घराबाहेर आणि परिसरात तैनात होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ध्रुव राठी काही दिवसांपूर्वी जर्मनीहून भारतात परतला होता.

ध्रुव राठी हा प्रसिद्ध यूट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारा विश्लेषक आहे. समकालीन घडामोडी, सामाजिक-राजकीय प्रश्न, पर्यावरण आणि इतिहास यांसारख्या विषयांवर विश्लेषणात्मक व्हिडिओ तयार करण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचा जन्म ८ ऑक्टोबर १९९४ रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला. त्याचे वडील अभियंता, तर आई शिक्षिका आहेत. उच्च शिक्षणासाठी तो वयाच्या १७व्या वर्षी जर्मनीला गेला होता.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ध्रुवने २०१४ मध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलची सुरुवात केली. सुरुवातीला त्याने आयफोनच्या मदतीने प्रवासाशी संबंधित व्हिडिओ म्हणजेच ट्रॅव्हल व्ह्लॉग्ज तयार करून अपलोड केले. त्यानंतर त्याने देश-विदेशातील गंभीर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोप्या भाषेत, आकडेवारी आणि ग्राफिक्सच्या मदतीने समजावून सांगण्यास सुरुवात केली. त्याच्या फॅक्ट-चेकिंग आणि एज्युकेशनल स्वरूपाच्या व्हिडिओंना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय प्रेक्षकांसाठी त्याने तमिळ, तेलुगू आणि बंगाली यांसारख्या अनेक प्रादेशिक भाषांमध्येही चॅनेल सुरू केले आहेत. त्याच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर मिळून कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. केवळ त्याच्या मुख्य यूट्यूब चॅनेलचे ४० मिलियन म्हणजेच चार कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech