नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि विरोधी पक्षांच्या आघाडीवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीने दिलेला जनादेश स्वीकारण्याऐवजी विरोधी पक्ष देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील १४० कोटी जनता शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. मात्र भारताची प्रगती आणि उन्नती विरोधकांना सहन होत नसल्याचे नवीन म्हणाले. देश अस्थिर करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
नितिन नवीन यांनी शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, देशात दोन राजकीय गट सक्रिय असून त्यांच्यात अराजकता निर्माण करण्याची स्पर्धा सुरू आहे. एका गटाचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची आघाडी करत आहे, तर दुसऱ्या गटात अरविंद केजरीवाल यांचे सहकारी सहभागी आहेत. जनतेचे विरोधकांच्या या प्रयत्नांकडे लक्ष आहे. लोकशाहीत जनादेशाचा आदर करणे ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप अध्यक्षांनी आरोप केला की, देशाला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांमागे राजकीय उद्दिष्टांसोबतच परकीय शक्तींचाही हात आहे. जागतिक संकटे असूनही भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे आणि आत्मनिर्भर तसेच सशक्त राष्ट्र म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत आहे. मात्र, विरोधकांना ही प्रगती मान्य नसल्याचे ते म्हणाले.
नवीन म्हणाले की, भारताची लोकशाही आणि देशभक्त जनतेची ताकद विरोधकांचे असे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या नावाखाली खोटा प्रचार करून जनादेशाला आव्हान देणे हा जनतेचा अपमान आहे, असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढणे, दहशतवादावर नियंत्रण मिळवणे आणि नक्षलवाद संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, काही लोक अद्यापही अर्बन नक्षलवादी मानसिकतेच्या माध्यमातून देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या आघाडीतील नेत्यांची भाषा तसेच घटनात्मक संस्थांप्रती त्यांचा दृष्टिकोन देशातील जनता पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतातील तरुण संविधान, लोकशाही आणि भारतीय संस्कृतीप्रती कटिबद्ध आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारचे राजकारण स्वीकारणार नाहीत. निवडणुकांमधील सातत्यपूर्ण पराभवामुळे निर्माण झालेल्या निराशेतून विरोधक देशात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवीन यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जनतेमध्ये राहून अशा प्रयत्नांना प्रत्युत्तर देतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याची ग्वाही नवीन यांनी दिली. भारताची शांतता, स्थैर्य आणि विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांतर्गत किंवा परदेशातील सर्व शक्तींशी कठोरपणे सामना केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.