सीजेपीच्या आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे; अभिजीत दिपकेंकडून घोषणा

0

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनापूर्वी ही कारवाई करण्यात आली. दिपके यांच्यासह पक्षाचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असतानाच अभिजीत दिपके यांनी एका व्हिडीओद्वारे आंदोलनाच्या नव्या नेतृत्वाची घोषणा केली. आता दिल्लीतील आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांचे पथक विमानात दाखल झाले. त्यानंतर दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तिघांनाही बसमधून अज्ञातस्थळी नेले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर कारवाई झाल्यामुळे जंतरमंतर येथील आंदोलनाचे भवितव्य अनिश्चित झाले होते. अशा परिस्थितीत दिपके यांनी व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांना अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे आवाहन केले. ‘आशुतोष रांका, सौरव दास आणि मला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आमच्या अनुपस्थितीत अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करेल. तुम्ही माझा हा व्हिडीओ पाहत असाल, तर अजिंक्य शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करा. आमच्यानंतर आंदोलनाची सर्व सूत्रे तो सांभाळेल,’ असे दिपके यांनी व्हिडीओत म्हटल्याचे सांगण्यात आले.

अजिंक्य शिंदे हे ३५ वर्षांचे असून कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्षातील त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. संघटनेचे कामकाज सांभाळणे आणि पक्षाच्या विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे, अशा जबाबदाऱ्यांशी त्यांच्या पदाचा संबंध असल्याचे सांगितले जाते. पक्षातील त्यांच्या भूमिकेची तुलना भाजपचे संघटनात्मक काम पाहणारे बी. एल. संतोष आणि काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांच्या भूमिकांशी केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech