विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल- भारतीय टपाल विभाग करणार विशेष लिफाफा जारी
नवी दिल्ली : ‘फ्लायदुबई’च्या (Flydubai) एका प्रवासी विमानातील कॉकपिटमध्ये ओमानच्या सह-वैमानिकाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने वार केले होते. या घटनेनंतर, विमान हायजॅक करण्याचा किंवा ते पाडण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुन्हा दाखल केला आहे. ‘अँटी-हायजॅकिंग ॲक्ट, २०१६’ चे कलम ३ आणि कठोर अशा ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, १९६७’ (UAPA) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, केंद्र सरकारने या घटनेचा तपास करण्याचे निर्देश संबंधित संस्थेला दिले होते. या हल्ल्याचा संबंध भारतावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याशी होता का, याचाही तपास केला जाणार आहे. तसेच संपूर्ण कट कसा रचण्यात आला, याचाही एजन्सी शोध घेणार आहे.
‘फ्लायदुबई’चे विमान FZ1073 हे १७४ प्रवासी आणि सहा कर्मचारी (क्रू मेंबर्स) यांच्यासह ३० सप्टेंबर रोजी दुबईहून रवाना झाले होते. हे विमान भारतीय नागरिक असलेले कॅप्टन मच्छार आणि ओमानचे ‘फर्स्ट ऑफिसर’ चालवत असताना हा कथित हल्ला झाला. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, फर्स्ट ऑफिसरने कॅप्टनवर चाकूने वार केले; प्रवाशांच्या मते, हा विमान हायजॅक करण्याचा किंवा ते पाडण्याचा प्रयत्न होता. या हल्ल्यात कॅप्टन मच्छार यांच्या डोक्यावर आणि हातांवर खोल जखमा झाल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर रोजी ‘विमान अपहरण-विरोधी कायदा, २०१६’ (Anti-Hijacking Act) आणि ‘बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७’ (UAPA) च्या संबंधित कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकारानंतर विमान सौदी अरेबियातील तबुककडे वळवण्यात आले, जिथे जखमी पायलटवर तातडीचे उपचार करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अबू धाबीला हलवण्यात आले होते. घटनेनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचे व प्रसंगावधानाचे कौतुक केले. त्यांच्या या कृतीचे भारतीय अधिकारी तसेच इस्रायल पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासह संयुक्त अरब अमिरातीमधील अधिकाऱ्यांनीही कौतुक केले. मच्छार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते अबू धाबीमध्ये उपचार घेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सुधारत आहे.