एप्रिल-सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण मालवाहतुकीची गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ४.१ % वाढ
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सप्टेंबर २०२६ मध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्हींमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतही मालवाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ नोंदवली गेली असून ही वाढ अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये रेल्वे वाहतुकीची सततची मागणी दर्शवते. भारतीय रेल्वेने सप्टेंबर २०२६ मध्ये १३५.३५ दशलक्ष टन मालवाहतूक केली असून सप्टेंबर २०२५ मध्ये ती १२७.५२ दशलक्ष टन होती. यंदा गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ६.१४ टक्के वाढ दिसून आली आहे. या महिन्यात अनेक प्रमुख घटकांच्या वाहतुकीत वाढ नोंदवली गेली. अन्नधान्याच्या मालवाहतूकीत २५ टक्के, क्लिंकरमध्ये २० टक्के, देशांतर्गत कंटेनरच्या वाहतुकीत १० टक्के, कोळशात ९ टक्के, उर्वरित इतर वस्तूंमध्ये ८.२ टक्के, खनिज तेलात ६ टक्के, तयार पोलादात ५.५ टक्के आणि लोहखनिजाच्या वाहतुकीत ५.२ टक्क्यांनी वाढ झाली.
भारतीय रेल्वेने सप्टेंबर २०२६ मध्ये वीज केंद्रांना देशांतर्गत कोळशाचा पुरवठा वाढवला. सप्टेंबर २०२५ मधील प्रति दिन ३९७ रेक्सच्या तुलनेत, प्रति दिन पुरवठा होणाऱ्या कोळशाच्या रेक्सची सरासरी संख्या वाढून ४४३ झाली, जी ११.६ टक्के वाढ दर्शवते. सप्टेंबर २०२६ मधील मालवाहतूक महसूल सप्टेंबर २०२५ च्या तुलनेत ₹१,२६६ कोटींनी वाढला. यात ९.३ टक्के वाढ दिसून येते. भारतीय रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२६ दरम्यान एकूण ८३३.७ दशलक्ष टन मालवाहतूक केली असून मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात ४.१ टक्के वाढ झाली आहे. याच कालावधीतील मालवाहतूक महसुलात ३.७ टक्के वाढ नोंदवली गेली.