मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित भारतातील २ हजार ३२ कोटी ८१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कलम ३७ अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रिलायन्स पॉवरच्या बँक खात्यातील रक्कम आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागीदारीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनिल अंबानी यांनी परदेशात कथितरीत्या बेकायदेशीररीत्या ठेवलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडून (सेबी) मिळालेल्या माहितीनंतर या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. कंपनीच्या खात्यांमध्ये २ हजार १०१ कोटी ४६ लाख रुपयांच्या राइट-ऑफ आणि आर्थिक तरतुदींची नोंद असल्याची माहितीही समोर आली आहे.
ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि केमन आयलंड्समधील कंपन्यांमध्ये करण्यात आलेली परदेशी गुंतवणूक तसेच आगाऊ रकमेच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. २००६ मध्ये रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेडने परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून ३०० दशलक्ष डॉलर उभारले होते. त्यापैकी २७५ दशलक्ष डॉलर सिंगापूरमधील उपकंपनीत गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे. या निधीच्या आधारे ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समधील कंपन्यांना कर्ज देण्यात आले. या कंपन्यांचे नियंत्रण भारतातून अनिल अंबानी समूहाकडून केले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.