अमेरिकेतील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला; भारताकडून अमेरिकी पोलिसांचे कौतुक

0

नवी दिल्ली : अमेरिकेतील शिकागो येथे हिंदू मंदिरात मोठ्या प्रमाणावर सामूहिक गोळीबार करून नरसंहार घडवण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. हल्लेखोराची बंदूक ऐनवेळी जाम झाल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, शिकागोस्थित भारतीय वाणिज्य दूतावासाने अमेरिकन पोलिसांनी १९ वर्षीय नव-नाझी विचारसरणीच्या संशयित आरोपी अलेक्झांड्रोस पापोराकिस याला तातडीने अटक केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले आहे.

शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले, “इलिनॉय राज्यातील ऑरोरा येथे एका धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची माहिती वाणिज्य दूतावासाला मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या त्वरित कारवाईचे आम्ही कौतुक करतो. या अयशस्वी दहशतवादी कटातील प्रत्येक घडामोडीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. तसेच, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायातील नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहोत.”

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आरोपी पापोराकिस ११ ऑक्टोबर रोजीच मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवण्याच्या तयारीत होता. ऑरोरा परिसरातील एखाद्या हिंदू धार्मिक स्थळाला लक्ष्य करून हल्ला करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.या गंभीर कटाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व हिंदू मंदिरे आणि धार्मिक स्थळांशी संपर्क साधून त्यांना संभाव्य धोक्याबाबत सतर्क करण्यात आले. तसेच, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या एका सहकाऱ्याला सांगितले होते की, तो शनिवारी शिकागोपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑरोरा येथील एका हिंदू मंदिरात गेला होता. तेथे त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने बंदुकीचे ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला असता बंदूक जाम झाली. त्यामुळे त्याचा हल्ल्याचा कट फसला.स्वतःला श्वेतवर्चस्ववादी आणि नव-नाझी विचारसरणीचा समर्थक म्हणवणाऱ्या अलेक्झांड्रोस पापोराकिसला त्याच्या सहकाऱ्याने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अटक केली. पोलिसांना आरोपीच्या घरातून स्वयंचलित रायफल, शेकडो काडतुसे आणि शरीराचे संरक्षण करणारे कवच आढळले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech