‘लहरा दो तिरंगा’ यात्रेपूर्वी अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात

0

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रमुख अभिजीत दिपके आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (एआयएसए) राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांना शुक्रवारी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमधून प्रस्तावित ‘लहरा दो तिरंगा’ यात्रेपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी दिल्ली पोलीस दिपके ज्या ठिकाणी थांबले होते, तेथे पोहोचले आणि त्यांना मोर्चा न काढण्याबाबतची नोटीस बजावली. मात्र, त्यानंतरही दिपके दिल्लीतील तिरंगा रॅलीसाठी रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नेहा बोरा यांना मंडी हाऊस येथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे (बीएनएसएस) कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या कलमानुसार, परवानगीशिवाय आंदोलन करणे, मोर्चा काढणे आणि गर्दी जमवण्यास मनाई आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, पोलीस अधिकारी दिपके यांना अडवत “तुम्हाला खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले जात आहे, कारण परिसरात बीएनएसएसची कलम १६३ लागू आहे आणि तुम्ही कनॉट प्लेसमध्ये जाऊ शकत नाही,” असे सांगताना दिसत आहेत.यावर अभिजीत दिपके अत्यंत आक्रमक होत पोलिसांना विचारतात, “सर, अजून तर मी कोणताही कायदा मोडलेलाच नाही. मी तर तुम्हाला फक्त विचारतोय की मी कुठे जाऊ शकतो? मी एकटाच आहे, मग तुम्ही मला कसे डिटेन करू शकता?” यावर, ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू, सध्या तुम्हाला ताब्यात घेत आहोत, असं सांगत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

अभिजीत दिपके यांना पोलिसांनी रोखल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ” सरकार किती लोकांना अटक करणार? अभिजीत यांना ताब्यात घेणे हे त्यांच्या मूलभूत हक्कांचे थेट उल्लंघन आहे. हे सरकार तिरंगा फडकवणाऱ्या तरुणांना का घाबरते? तुम्ही जितक्या लोकांना अटक कराल, तितकेच तरुण रस्त्यावर उतरतील,” असा थेट इशारा पक्षाने दिला आहे. दरम्यान, दिपके यांनी एक दिवस आधी आपल्या समर्थकांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या घोषणेनंतर परिसरात आधीच तैनात असलेल्या सुरक्षा दलांची संख्या आणखी वाढवण्यात आली. कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात ११ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी २१ प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्याची योजना तयार केली आहे.

यापूर्वी आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मुख्यालयातून तिरंगा यात्रा काढली. या यात्रेत पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “विनाश काले विपरीत बुद्धी! मोदीजी, तुम्हाला तिरंग्याची इतकी भीती का वाटते? अभिजीत दिपकेंना ताब्यात घेऊन तुम्हाला काय मिळणार? या कारवाईमुळे हे आंदोलन थांबणार नाही तर ते अधिक तीव्र होईल,” असा हल्लाबोल संजय सिंह यांनी केला. उल्लेखनीय म्हणजे, कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी), डावे पक्ष, अन्य विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना या आंदोलनात प्रामुख्याने सक्रिय आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि विशेष सखोल फेरतपासणीची (एसआयआर) प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech