अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, थोडक्यात बचावला

0

बिश्नोई गँगने स्विकारली जबाबदारी; टायगरचा चालक आणि रिक्षा चालक जखमी, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे निर्देश

मुंबई  : जुहू पोलीस ठाण्याच्या अवघ्या १०० मीटर अंतरावर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये टायगर श्रॉफ बचावला असला तरी त्याचा ड्रायव्हर मात्र गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल सात राऊंड फायर केल्यानंतर दुचाकीवरून आरोपी फरार झाले. दरम्यान बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुहू पोलीस ठाण्याच्या १०० मीटर अंतरावर हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर आता रस्ता बंद करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथून ३०० मीटर अंतरावरती रोहित शेट्टी यांच्याच घरावरती गोळीबार झाला होता. दरम्यान, टायगरच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. या संदर्भातील एक ऑडिओ व्हायरल झाला असून या संदर्भात जर सलमान खानसोबत काम केल्यास प्रत्येकाचे हाल असाच होईल, अशी धमकी सुद्धा दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

पोलिसांनी माहिती दिली आहे की, टायगर श्रॉफ हा सुरक्षित आहे. जुहूतील पुष्पा पार्क येथे ही घटना घडली आहे. टायगर त्याठिकाणी फुटबॉल खेळायला गेला होता, त्यावेळी ही घटना घडली आहे. तिन्ही व्यक्ती या दुचाकीवरुन आल्या होत्या त्यांनी अचानकपणे गोळीबार सुरु केला. पण सुदैवाने या गोळीबारामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ हा थोडक्यात बचावला आहे. यावेळी टायगरसोबत त्याचा चालक होता. त्याशिवाय याठिकाणी एक रिक्षाचालकही होता, अशी सुरुवातीला माहिती समोर आली होती. पण आता टायगर सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech