नवी दिल्ली : इराणसमर्थित हुती बंडखोरांच्या हल्ल्यांनंतर सुरक्षेबाबत चिंता वाढल्याने रियाधमधील भारतीय दूतावास सतर्क झाला आहे. भारतीय दूतावासाने रविवारी भारतीय नागरिकांसाठी विशेष सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय आपत्कालीन पूर्वसूचना प्रणालीद्वारे इशारा मिळाल्यास जारी करण्यात आलेल्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष द्यावे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सामायिक करण्यात आलेल्या या सूचनांमध्ये नागरिकांना शांत राहण्याचे, अधिकृत निर्देशांचे पालन करण्याचे आणि तातडीने इमारतीतील सर्वांत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हल्ल्याचा धोका असेपर्यंत खिडक्यांपासून दूर असलेल्या आतील खोलीत राहणे अधिक सुरक्षित ठरेल, असेही सांगण्यात आले आहे.धोका पूर्णपणे टळेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर किंवा इमारतीतून बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. मोकळ्या जागा, खिडक्या आणि काचेच्या वस्तूंपासून दूर राहावे. तसेच बाल्कनी किंवा छतावर जाणे टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जे नागरिक घराबाहेर असतील, त्यांनी जवळच्या इमारतीत आश्रय घ्यावा किंवा मजबूत भिंतीच्या आड सुरक्षित ठिकाणी थांबावे, असेही सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी गर्दीची ठिकाणे आणि धोकादायक परिसरांपासून दूर राहावे. तसेच घटनांची छायाचित्रे काढू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. वाहन चालवत असताना आपत्कालीन इशारा मिळाल्यास पूल आणि उंच इमारतींपासून दूर रस्त्याच्या कडेला वाहन थांबवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मक्का, मदिना, रियाध आणि पूर्व प्रांतात कोणताही धोका किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी ९११ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. तर सौदी अरेबियाच्या इतर भागांतील नागरिकांनी ९९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत माध्यमांतून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
येमेनमधील हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाला लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जात असल्याने सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे. यामध्ये १० ऑक्टोबर रोजी रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्याचाही समावेश आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर भारतीय दूतावासाने नागरिकांसाठीच्या सुरक्षा सूचनांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. १० ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर भारतीय दूतावासाने नागरिकांना स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे, हवाई हल्ल्याच्या परिस्थितीत घरातच सुरक्षित राहण्याचे आणि सुरू असलेल्या घटनांशी संबंधित माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ चित्रित करणे, प्रकाशित करणे अथवा सामायिक करणे टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता दूतावासाने नव्याने सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत.