कोटा : अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात राजस्थान पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, त्यापैकी दोघे रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर संशयितांनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी मुंबईतून रेल्वेने पलायन केले. महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यानंतर ते गुजरातमार्गे राजस्थानमधील कोटा येथे पोहोचले.
दरम्यान कोटा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेने प्रवास करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपास यंत्रणांना हा हल्ला पूर्वनियोजन करून करण्यात आल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी कथितरीत्या टायगर श्रॉफ यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवले होते. अभिनेता दर रविवारी जुहू येथील फुटबॉल मैदानावर येत असल्याची माहिती संशयितांना असल्याचा प्राथमिक तपासात अंदाज व्यक्त केला जात आहे.अभिनेता आपल्या कारमध्ये बसून तेथून निघत असताना गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि त्यामागे अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अद्याप सुरू आहे.
गोळीबारानंतर संशयितांनी पूर्वनियोजित मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यांनी एस. व्ही. रोडमार्गे विलेपार्ले आणि अंधेरीच्या दिशेने प्रवास केला. त्यानंतर अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडून बोरीवलीच्या दिशेने जाणारी रेल्वे पकडल्याची माहिती तपासात समोर आली आहे.रेल्वेने प्रवास करत असताना संशयितांचा माग काढून त्यांना कोटा येथे ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील इतर संभाव्य आरोपी, हल्ल्याचा उद्देश आणि घटनेमागील सूत्रधार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.