नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारत आणि पोलंड संरक्षण, अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यास सहमत झाले आहेत. त्यांनी पोलिश कंपन्यांना या क्षेत्रांमध्ये सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे चर्चा केली. चर्चेनंतर मोदी म्हणाले की, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय आर्थिक सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.पोलंडच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत करताना मोदी म्हणाले की, २०२४ मध्ये पोलंड दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी आपले संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले होते. या मजबूत पायावर गेल्या दोन वर्षांत द्विपक्षीय भागीदारीला नवीन गती मिळाली आहे. भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यानेही दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी नवीन शक्यता निर्माण केल्या आहेत.
मोदी म्हणाले की, भारत-पोलंड संबंध केवळ राजनैतिक संपर्कांपुरते मर्यादित नसून, ते मानवता आणि करुणेच्या सामायिक वारशावर आधारित आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जामनगर आणि कोल्हापूरच्या राजघराण्यांनी भारतात हजारो पोलिश मुलांना आणि कुटुंबांना आश्रय दिला होता. त्यांनी सांस्कृतिक आणि लोकांमधील संपर्कांना दोन्ही देशांमधील संबंधांची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पोलंडमध्ये संस्कृत अभ्यास आणि भारतीय विद्याशाखेची समृद्ध परंपरा आहे. क्राकोव्हमध्ये भारतीय अभ्यास विभागाची स्थापना हा हा सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे. भारत आणि पोलंड लोकशाही मूल्ये आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवतात. जागतिक प्रशासकीय संस्थांना अधिक शक्तिशाली आणि प्रभावी बनवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याची गरज दोन्ही देश ओळखतात.युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, शांततेसाठीच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रयत्नांना भारत पाठिंबा देत राहील.