• रासायनिक उद्योगासाठी पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे नियोजन
मुंबई : रासायनिक उद्योगातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण तयार करीत असून, हे धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. वाढत्या औद्योगिक गरजा, गुंतवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगस्नेही वातावरण यांचा विचार करून हे धोरण तयार करण्यात येत असून पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या परिसरात मोठे रासायनिक उद्योग केंद्र विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे ३,६०० उद्योग रासायनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. देशाच्या रासायनिक उद्योगातील एकूण स्थूल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा सुमारे १९ टक्के, तर रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत सुमारे १७ टक्के वाटा आहे. राज्यात पेट्रोकेमिकल्स, कृषी रसायने, विशेष रसायने, पॉलिमर आणि औद्योगिक रसायनांच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. रासायनिक उद्योगासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या गरजा आणि भविष्यातील गुंतवणुकीच्या अपेक्षा विचारात घेण्यात आल्या आहेत. उद्योगांना परवानग्या मिळविणे सुलभ व्हावे, गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि उद्योगांना विविध विभागांच्या प्रक्रियांमुळे अडथळे येऊ नयेत, यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी ‘मैत्री’ हे एक खिडकी व्यासपीठ आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढवण बंदरामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या बंदराच्या परिसरात रासायनिक उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगांचे समूह विकसित करण्याची संधी आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या भव्य रसायन उद्यान योजनेच्या माध्यमातूनही महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्राने जागतिक स्तरावर महत्वाचे स्थान मिळवले असले, तरी औषधनिर्मितीसाठी आवश्यक सक्रिय औषधघटकांच्या (एपीआय) उत्पादनात अधिक स्वावलंबन आवश्यक आहे. यासाठी बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादन वाढविण्याची गरज असून, महाराष्ट्रातही या क्षेत्रासाठी आवश्यक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
रासायनिक उद्योग हा बांधकाम, औषधनिर्मिती, वाहननिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी, खते, पॅकेजिंग आणि पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाचा आहे. या उद्योगातील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देणे आवश्यक आहे. जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये निर्माण झालेल्या बदलांमुळे भारताला रासायनिक उद्योगात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधींचा लाभ घेऊन देशांतर्गत उत्पादन वाढविणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान मजबूत करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्याच्या औद्योगिक विकासात रासायनिक उद्योगाचे योगदान अधिक वाढविण्यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर दिला जात आहे. सध्या या क्षेत्रातून महाराष्ट्रात सुमारे तीन लाख रोजगार उपलब्ध झाले असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दुप्पट करण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.