आरोप-प्रत्यारोप थांबवून थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : एकमेकांवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबवून थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षीय मंत्री, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिप नंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची अहमअहमिका सुरू झाली होती, आता ही कटुता टाळून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश शिंदे यांनी सर्वांना दिले आहेत.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून अशा कठीण काळात शेतकऱ्याला आधार देणे हे शिवसेनेचे प्रथम कर्तव्य आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी साडेतीन लाख धान्याची किट पाठवण्यात आली होती. ही मदत त्या त्या भागात पोहोचली असून ती थेट गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहचवणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य आहे.

यासोबतच राज्य सरकारकडून जाहीर होणारी मदत प्रत्यक्षात प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही, याची कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी असेही शिंदे यांनी सांगितले आहे. शासकीय मदतीसाठी लागणारे अर्ज भरण्यापासून ते पंचनाम्यांच्या प्रक्रियेपर्यंत सर्व प्रशासकीय कामांत शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले आहे.

आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला दिला होता. हा शब्द पाळण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन शिंदे यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech