बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

0

आंध्र प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यांना अतिवृष्टीचा इशारा, चक्रीवादळ २६ ऑक्टोबरपर्यंत विकसित होण्याची शक्यता

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात २६ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. तिच्या प्रभावामुळे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि तेलंगणामध्येही काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.ओडिशामध्ये २७ आणि २९ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, २८ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील आणि सखल भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात पाऊस

अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप तसेच आसपासच्या भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे २४ व २५ ऑक्टोबर रोजी, तर केरळ आणि माहे येथे २५ व २६ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लक्षद्वीप, कर्नाटक आणि रायलसीमा परिसरात ३० ऑक्टोबरपर्यंत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह वादळी पावसाची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech