भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी ओडिशाच्या दौऱ्यावर असतील. यावेळी ते भुवनेश्वर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नवनिर्मित डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता या सुविधांचे उद्घाटन केल्यानंतर जाहीर सभेलाही संबोधित करतील. भुवनेश्वर येथे उभारण्यात आलेले आरबीआयचे डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा तांत्रिक पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संगणकीय गरजा पूर्ण करण्यासोबतच बँकिंग आणि व्यापक आर्थिक क्षेत्रासाठी सुरक्षित, विश्वासार्ह, विस्तारक्षम तसेच भविष्यातील गरजांनुसार तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत चार अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये पेमेंट आणि सेटलमेंटशी संबंधित महत्त्वाच्या प्रणालींसह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर प्रमुख उपक्रमांचे संचालन केले जाणार आहे. या सुविधेला डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक मानक मानल्या जाणाऱ्या अपटाइम इन्स्टिट्यूटच्या टियर-४ मानकानुसार प्रमाणपत्र मिळाले आहे. हे मानक परिचालनातील विश्वासार्हता आणि पायाभूत सुविधांच्या मजबुतीची सर्वोच्च पातळी दर्शवते. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या टियर-४ प्रमाणित सुविधांपैकी ही एक आहे.