रायगड : रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ल्याच्या तटबंदीची आलिशान बंगले आणि फार्महाऊस उभारण्यासाठी जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने तोडफोड केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षित स्मारक असतानाही परिसरात उत्खनन सुरू असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.
किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीचे दगड खासगी बांधकामांसाठी काढले जात असून, त्यामुळे पुरातन वास्तू आणि अवशेषांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. संरक्षित स्मारकापासून १०० मीटरचा परिसर प्रतिबंधित, तर पुढील २०० मीटरचा परिसर नियंत्रित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या क्षेत्रात बांधकाम आणि उत्खननासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र, नियमांचे उल्लंघन करून काम सुरू असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून घटनास्थळाचा पंचनामा करावा, सुरू असलेले काम तातडीने थांबवावे आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच किल्ल्याच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि अलिबाग तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी प्रशासन काय कारवाई करते, याकडे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.