रायगडच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी विरोधात धडक कारवाई

0

रायगड : जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात एलईडी दिव्यांच्या साहाय्याने अवैध मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. मांडवा समुद्रक्षेत्रात करण्यात आलेल्या या कारवाईत नौकेसह ३० एलईडी दिवे आणि एक जनरेटर जप्त करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात नियमित गस्त सुरू असताना हा प्रकार निदर्शनास आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी महेश खरात यांनी ही कारवाई केली. केशव पांडुरंग कोळी (रा. वर्सोवा, मुंबई) यांच्या मालकीच्या ‘महालक्ष्मी प्रसन्न-२’ (नोंदणी क्रमांक IND-MH-2MM-5785) या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

जप्त केलेले ३० एलईडी दिवे आणि जनरेटर सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. तसेच नौका ताब्यात घेऊन मांडवा येथील जेट्टीवर आणण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. रायगडच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी, एलईडी दिव्यांचा अनधिकृत वापर आणि मत्स्यसंपत्तीचे नुकसान रोखण्यासाठी विभागाकडून नियमित गस्त घालण्यात येत आहे. अशा प्रकारांमध्ये सहभागी नौकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech