रायगड : आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत उत्तम खेळाडू घडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पेण प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी केले.
आदिवासी विकास विभाग, पेण प्रकल्पांतर्गत आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन नुकतेच उत्साहात झाले. या स्पर्धेत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील एकूण १ हजार ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा दोरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष माने, महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर कारोटे, पंचायत समिती सदस्य अक्षय तीतकारे, राष्ट्रीय खेळाडू स्फूर्ती माने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता सातत्याने मेहनत, जिद्द व चिकाटीने खेळात प्रगती करावी, असे आवाहन गलांडे यांनी केले. क्रीडा शिक्षकांनी स्पर्धांच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष माने यांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्रीडा क्षमता असून, योग्य मार्गदर्शन, सराव आणि संधी मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. या स्पर्धांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला व्यासपीठ मिळाले आहे.