इराणच्या तेल व्यापाराला साथ पडली महागात; भारतातील कंपन्या आणि नागरिकांवर अमेरिकेचे नवे निर्बंध

0

नवी दिल्ली : अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने बुधवारी इराणशी संबंध असल्याच्या आरोपावरून भारत आणि तुर्किये येथील काही कंपन्या तसेच व्यक्तींवर नवे निर्बंध लादले. इराणच्या राजवटीला पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात यापुढेही कारवाई सुरूच ठेवली जाईल, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.हे निर्बंध ट्रम्प प्रशासनाच्या ‘ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट’ या मोहिमेचा भाग आहेत. इराणला अमेरिकेविरोधातील युद्धासाठी तेलविक्रीतून आर्थिक निधी उभारण्याची संधी मिळू नये आणि त्याची ही क्षमता संपुष्टात आणावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने केलेल्या कारवाईमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे म्हटले होते. परिणामी, इराणचे चलन रियाल आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर पोहोचले असून, देशातील महागाईचा दर जवळपास ९० टक्क्यांवर गेला आहे.

अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ताज्या कारवाईत भारतात राहणारे सुनील कुमार शर्मा, त्यांची पत्नी जसप्रीत प्रीती शाहिद आणि या दाम्पत्याच्या दोन व्यावसायिक संस्थांचे नेतृत्व करणारे अन्य दोन भारतीय नागरिक यांच्या कथित मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कला लक्ष्य करण्यात आले आहे. याशिवाय, शर्मा यांच्याशी संबंधित अन्य नऊ संस्थांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून इराणी तेलाची वाहतूक करणाऱ्या निर्बंधित जहाजांना चुकीची ओळख आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये इराणचे लष्कर आणि त्याच्या सहकारी संघटनांकडून संचालित केल्या जाणाऱ्या जहाजांचाही समावेश आहे.

दरम्यान, इराणच्या निर्बंधांच्या कक्षेत आलेल्या विमान वाहतूक क्षेत्राला सातत्याने मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने तुर्कियेस्थित ‘फुगो ग्राउंड सर्व्हिसेस इंक.’ या कंपनीवरही निर्बंध लादले आहेत. इराणला कथित मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने भारतीय कंपन्यांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अमेरिकेने अनेक भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने मुंबईस्थित दोन कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित पाच भारतीय नागरिकांवर इराणमधून पेट्रोलियम पदार्थांच्या व्यापारात सहभागी असल्याच्या आरोपावरून निर्बंध लादले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इराणमधून पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीसाठी मदत केल्याच्या आरोपावरून ‘एसएसपीएल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘समुद्र मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांविरोधातही कारवाई केली आहे. एसएसपीएल सोल्युशन्सशी संबंधित ध्वनी वोरा आणि निसर्ग वोरा, तर समुद्र मरीन सर्व्हिसेसशी संबंधित केतन कोचिकर, भूपेंद्रसिंह साहू आणि हरिश्याम हरिहरन या पाच जणांचाही निर्बंधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech