मुंबई : टेक कंपनी वनप्लस उद्या ८ जुलै रोजी वनप्लस नॉर्ड ५ आणि नॉर्ड सीई ५ हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अधिकृत वेबसाइटवर लाँचची तारीख आधीच जाहीर केली आहे. चाहत्यांमध्ये सध्या वनप्लसच्या आगामी नॉर्ड ५ स्मार्टफोनबाबत मोठी चर्चा सुरू आहे. कारण या फोनमध्ये कंपनी ७,०००mAh क्षमतेची दमदार बॅटरी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बॅटरी जर प्रत्यक्षात आली, तर ती या किमतीच्या श्रेणीत दुर्मिळ ठरेल आणि वापरकर्त्यांना दिवसभर उत्तम बॅकअप मिळेल आणि विशेष म्हणजे, १००W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे इतकी मोठी बॅटरी देखील कमी वेळात चार्ज होऊ शकते.
या स्मार्टफोन मधील प्रोसेसरबाबत बोलायचे झाल्यास, वनप्लस नॉर्ड ५ मध्ये स्नॅपड्रॅगन ८s Gen ३ चिपसेट दिला जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही चिप अतिशय शक्तिशाली असून याआधीच्या नॉर्ड ४ मधील स्नॅपड्रॅगन ७+ Gen ३ च्या तुलनेत मोठी अपग्रेड मानली जात आहे. सुरुवातीला मीडियाटेक डायमेन्सिटी ९४००e वापरण्याची चर्चा होती, मात्र आता स्नॅपड्रॅगनवर शिक्कामोर्तब झाले आहे.
डिस्प्लेबाबतही लीक अपडेट्समध्ये उत्सुकता वाढवणारी माहिती आहे. फोनमध्ये १.५K रिझोल्यूशनसह १२०Hz रिफ्रेश रेट असलेली फ्लॅट OLED स्क्रीन दिली जाऊ शकते. ही स्क्रीन ६.७४ इंच किंवा त्याहून थोडी मोठी असण्याची शक्यता आहे. डिझाईनच्या बाबतीत कंपनी ड्युअल-टोन फिनिशला अलविदा करून, अधिक साधे आणि क्लीन लुक देण्याच्या तयारीत आहे. फोन ऑफ-व्हाईट आणि पेल ब्लू रंगांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
कॅमेऱ्यांमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. मागील मॉडेलप्रमाणेच ५०MP मुख्य कॅमेरा आणि ८MP अल्ट्रा-वाइड लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फीसाठी १६MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. हार्डवेअरमध्ये फारसा बदल न करता, सॉफ्टवेअरच्या मदतीने फोटोंची क्वालिटी सुधारण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. वनप्लस नॉर्ड ५ मध्ये यावेळी मेटल फ्रेमऐवजी प्लास्टिक फ्रेम आणि ग्लास बॅक दिला जाऊ शकतो. यामुळे फोन हलका आणि किंमतही तुलनेने कमी राहू शकते, परंतु प्रीमियम फील थोडा कमी वाटू शकतो.
नॉर्ड सीई ५ : किफायतशीर किंमतीत दमदार फीचर्स : यासोबतच,वनप्लस नॉर्ड सीई ५ देखील लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.7 इंच OLED डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० प्रोसेसर, ८GB RAM आणि २५६GB स्टोरेज दिले जाऊ शकते. खास म्हणजे यात ७,१००mAh बॅटरी आणि ८०W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही असू शकतो. कॅमेरा विभागातही ५०MP मुख्य सेन्सर, ८MP अल्ट्रा-वाइड आणि १६ MP फ्रंट कॅमेरा देण्यात येऊ शकतो.
भारतात अपेक्षित किंमत : किंमत ही ग्राहकांसाठी मोठा मुद्दा ठरणार आहे. नॉर्ड ५ ची किंमत ३०,००० रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे, तर नॉर्ड CE ५ ची किंमत सुमारे २५,००० रुपये असू शकते. यामुळे हे दोन्ही फोन त्यांच्या सेगमेंटमध्ये इतर ब्रँड्ससाठी जबरदस्त स्पर्धा उभे करू शकतात. एकंदरीत, वनप्लस नॉर्ड ५ आणि नॉर्ड सीई ५ हे दोन्ही स्मार्टफोन दमदार बॅटरी, उत्तम प्रोसेसर आणि आकर्षक डिस्प्लेसह भारतीय बाजारात धमाका करणार असल्याची शक्यता आहे. लाँचची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.