पवईत १७ ओलीस मुलांची सुटका; आरोपी चकमकीत ठार

0

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पवई परिसरात ‘रॉ स्टुडिओ’ नावाच्या बंद इमारतीत ऑडिशन व अभिनय कार्यशाळेच्या नावाखाली १७ अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली असून आरोपी रोहित आर्य पोलिस चकमकीत ठार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलं दिवसभर कार्यशाळेतून बाहेर न आल्यानं त्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली. पालक स्टुडिओजवळ पोहोचल्यावर काही मुलं खिडकीतून मदतीसाठी हाक मारताना दिसली. तात्काळ स्थानिकांनी पवई आणि साकीनाका पोलिस ठाण्यांना कळविल्यानंतर पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी रोहित आर्य याला दरवाजा उघडण्यास सांगितले असता, त्याने स्वतःकडे शस्त्र आणि ज्वलनशील पदार्थ असल्याचे दाखवून “कोणी आत आलं किंवा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तर स्टुडिओ पेटवून देईन,” अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या परिस्थितीत पोलिसांनी संवाद साधत मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व १७ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. दरम्यान, आरोपी रोहित आर्यने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपल्या कृतीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. “मी आत्महत्या करण्याऐवजी एक योजना आखली आहे. काही मुलांना ओलीस ठेवले आहे. माझ्या काही मागण्या आणि प्रश्न आहेत. मी कोणताही दहशतवादी नाही, पैशांची मागणीही करत नाही,” असे तो व्हिडिओत म्हणाला होता.

सुटकेनंतर झालेल्या पोलिस कारवाईत रोहित आर्यच्या छातीवर गोळी लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत मुलांना ओलीस ठेवण्यामागे काही प्रलंबित कामातील थकबाकी हा प्रमुख मुद्दा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “दुपारी सुमारे १.४५ वाजता आम्हाला माहिती मिळताच पथक घटनास्थळी रवाना झाले आणि मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech