एसटी महामंडळाच्या २ हजार बसेसचा एमएसटीसीच्या माध्यमातून होणार लिलाव

0

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २ हजार बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळाच्या (एमएसटीसी) माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे. राज्यभरातील ३२ आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून, त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, वयोमर्यादेमुळे जुन्या झालेल्या बसेस भंगारात काढण्यास सुरुवात केली आहे.

राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) राज्यातील सर्व सार्वजनिक प्रवासी वाहतूक महामंडळांना लिलावामध्ये केवळ राज्यातील बोलीदारांनाच सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत. या अगोदर देशभरातील बोलीदार या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत होते. आता त्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यासाठी राज्यात केवळ दोनच मोठे बोलीदार असून, एसटीच्या बसला योग्य दर मिळेल का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दरवर्षी सुमारे २ हजार बसेस भंगारात निघत असून, येत्या दोन ते तीन वर्षांत सुमारे ५ हजार बसेस भंगारात निघणार आहेत. पूर्वीच्या लिलावात २ ते २.५ लाख प्रत्येक बस, असा महसूल महामंडळाला मिळाला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech