पंढरपूर : आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७) सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार आज (दि.२७) चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक १६ जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
आषाढीवेळी पंढरपुरात पूर परिस्थिती टाण्यासाठी विशेष काळजी
आषाढी वारीवरील संभाव्य पूर संकट टाळण्यासाठी अवघ्या पाच दिवसांत उजनीतून चार टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. ४ ते ८ जुलै या काळात चंद्रभागेत अवघा पाच हजार क्युसेकचा विसर्ग राहील, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. मुसळधार पाऊस झाला तरी उजनीत तीन-चार दिवस तो पूर्ण विसर्ग साठवून ठेवता येईल, यासाठी धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत आणला आहे. श्री पांडुरंगाच्या आषाढी सोहळ्यासाठी अंदाजे १३ ते १५ लाख भाविक ६ जुलै रोजी पंढरपूरमध्ये असतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. पण चंद्रभागेच्या वाळवंटात पाण्याचा मोठा विसर्ग राहिल्यास त्याठिकाणी थांबणाऱ्या दोन ते तीन लाख वारकऱ्यांची पर्यायी सोय कोठे करता येईल, यावर प्रशासनाचे विचारमंथन सुरू आहे. मात्र, १५ ते २० हजार क्युसेकचा विसर्ग राहिला तरी चंद्रभागेच्या वाळवंटात पाणी राहते. त्यामुळे वारी काळात उजनीतून सोडला जाणारा विसर्ग पाच हजारांपर्यंतच असावा, यादृष्टीने सध्या भीमा नदीतून सध्या मोठा विसर्ग सोडून दिला जात आहे.