जैश-ए-मोहम्मदचे ३ दहशतवादी बिहारमध्ये घुसले; हाय अलर्ट जारी

0

पाटणा : बिहारमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (२८ ऑगस्ट) बिहार पोलिस मुख्यालयाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या प्रवेशाची बातमी मिळताच सुरक्षा दृष्टीने पोलिस मुख्यालयासह वरिष्ठ अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिघेही अतिरेकी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसले आहेत. तिघेही पाकिस्तानचे रहिवासी आहेत. हसनैन अली रावळपिंडीचा रहिवासी आहे, आदिल हुसैन उमरकोटचा आहे, तर तिसरा मोहम्मद उस्मान बहावलपूरचा आहे. हे तिघेही जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

बिहार पोलिस मुख्यालयाने या तिघा अतिरेक्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यांचे पासपोर्टशी संबंधित माहितीही सीमावर्ती जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यात आली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने अतिरेकी हालचालींवर पोलिस मुख्यालयाकडून सतत नजर ठेवली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची माहिती समोर आली असून हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे, धक्कादायक बाब म्हणजे हे तिघे अतिरेकी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच काठमांडूत पोहोचले होते. तिथून गेल्या आठवड्यात बिहारमध्ये प्रवेश केला. आता ही माहिती उघड झाली आहे. या अतिरेक्यांकडून देशातील कुठल्याही भागात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांच्या गुप्तचर यंत्रणांना सक्रिय करून माहिती संकलन करण्याचे आणि संशयित अतिरेक्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लक्षात घ्यावे की बिहारमध्ये अशा काळात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेव्हा राज्यात एसआयआरचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसारख्या विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचा बिहार दौरा सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech