छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ७१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0

आत्मसमर्पितांपैकी ३० जणांवर होते ६४ लाखांचे बक्षीस
दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे ७१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांपैकी ३० नक्षलवाद्यांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ नक्षली कमांडर देखील सहभागी आहेत. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर जंगलतोड, झाडांची कत्तल आणि पोलीसांशी चकमकीत सहभागी होणे यांसारखे गंभीर आरोप होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये बामन मडकाम (८ लाखांचे बक्षीस), शमिला कवासी (५ लाखांचे बक्षीस), गंगी बारसे (५ लाखांचे बक्षीस) यांचा समावेश आहे. या सर्वांवर जंगलात हिंसक कारवाया आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यांचे आरोप होते. नक्षलवाद्यांच्या विरोधातील या व्यापक अभियानाचे नेतृत्व पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी, डीआयजी कमलोचन कश्यप आणि एसपी गौरव राय यांनी केले. अभियानात डीआरजी (जिल्हा रक्षक गट), बस्तर फाइटर्स, विशेष गुप्तचर शाखा आणि सीआरपीएफच्या विविध बटालियन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वरोजगारासाठी मदत व मार्गदर्शन या योजनांमुळे हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाने जीवन जगू शकतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

एसपी गौरव राय यांच्या मते, पोलीस दलाच्या आक्रमक आणि सतत चालणाऱ्या मोहिमा यामुळे माओवादी संघटना कमकुवत झाली आहे. परिणामी अनेक नक्षलवादी आता आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेत आहेत. हे आत्मसमर्पण ‘लोन वर्राटू’ या विशेष मोहिमेच्या यशाचे प्रतिक आहे. ‘लोन वर्राटू’ या स्थानिक भाषेतील शब्दाचा अर्थ आहे “घरी परत या”. हा उपक्रम दंतेवाडा पोलिसांनी नक्षलवाद्यांना शरण येण्यासाठी सुरू केलेला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १११३ हून अधिक नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतले आहेत. दंतेवाडा पोलिसांनी पुन्हा एकदा उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता आणि विकासाच्या वाटेवर येण्याचे आवाहन केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech