नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडि आघाडीला आज, शुक्रवारी मोठा धक्का बसला. आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीसोबतचे संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी याबाबत घोषणा केली. लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आम आदमी पक्षाने इंडि आघाडीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसह अनेक वडणुका आपने स्वबळावर लढल्या होत्या. दरम्यान, आज आम आदमी पक्षाने इंडि आघाडीपासून फारकत घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. याबाबत आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, आमचा पक्ष इंडिया आघाडीने बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणार नाही. आमचा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आप इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे.
आम आदमी पक्ष संसदीय प्रश्नांवर तृणमूल काँग्रेस, डीएमके यांसारख्या विरोधी पक्षांसोबत समन्वय राखून त्यांना पाठिंबा देईल असे संजय सिंह यांनी सांगितले. इंडि-आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन झाली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाने हरयाणा आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसोबत पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुका स्वबळावर लढल्या होत्या. अशाप्रकारे इंडि आघाडीमधून आम आदमी पक्ष राजकीयदृष्ट्या आधीच वेगळा झाला होता. संजय सिंह यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या इंडि आघाडीच्या बैठकीला आम आदमी पक्ष उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.