मुंबई : नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असून संबंधित कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य समीर कुणावार, हिरामण खोसकर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला. मंत्री झिरवाळ म्हणाले, दि. १० मार्च २०२५ रोजी अक्कलकुवा येथील मे. गोपाल प्रोव्हिजन या आस्थापनाची तपासणी करताना महिका ब्रँडचे रिफाईन्ड सोयाबीन तेल व कमला ब्रँडचे शेंगदाणा तेल या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते.
प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार हे नमुने अन्न सुरक्षा मानकांनुसार अप्रमाणित आढळले. विक्रेत्याने अपील केल्यामुळे नमुने फेरविश्लेषणासाठी सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर येथे पाठविण्यात आले आहेत. सन २०२४-२५ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात खाद्यतेलाचे एकूण १२ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ५ नमुने अयोग्य दर्जाचे घोषित करण्यात आले आहेत. त्यातील २ प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई सुरू असून उर्वरित ३ नमुने रेफरल प्रयोगशाळेकडून तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असे मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.