मुंबई : दुबई येथे होत असलेल्या आशिय चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर विविध क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेने (ठाकरे) महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका घेतली. तर पहलगाममध्ये बळी पडलेल्या कुटुंबाचे नातेवाईकही या सामन्यावरून बीसीसीआयवर टीका करत आहेत. अशातच आता मनोरंजन क्षेत्रातूनही प्रतिक्रिया येत आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आजच्या सामन्यावर मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाम फाऊंडेशनाचा दशकपूर्ती सोहळा पुण्यात पार पडला. या सोहळ्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नाना पाटेकर यांना आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याला होत असलेल्या विरोधाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मी खरंतर यावर बोलू नये, असं मला वाटतं. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की, खेळू नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे. तर आपण त्यांच्याशी का खेळावं?”
“शेवटी माझ्या हातात असलेल्या गोष्टीवर बोलून फायदा आहे. फक्त मत व्यक्त करून काय होणार? नाना पाटेकरनं मत व्यक्त करून हा विषय सुटणार नाही. सरकारचं धोरण काय आहे? त्यांचे नियम काय आहेत, यावर ते ठरत असतं”, असेही पुढे नाना पाटेकर म्हणाले.
या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळावर मात करण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून काम केले आहे. या कामाचा यावेळी गौरव करण्यात आला.
पहलगामच्या बळींच्या भावनांचं काय?
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले होते. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे हेही एक होते. आज भारत-पाकिस्तान सामना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे आणि पत्नी प्रगती जगदाळे यांनीही नाराजी व्यक्त केली. “आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानात जावं लागू नये किंवा त्यांच्या क्रिकेटपटूंना इथं यावं लागू नये, यासाठी तुम्ही दुबईमध्ये आशिया चषक ठेवला आहे. याचा अर्थ तुम्ही अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला निधी पुरवत आहात. फक्त करार स्थगित करून, पाणी आणि व्यापार बंद करून संबंध तोडले असं होत नाही. तुम्हाला जर मारल्या गेलेल्या लोकांबद्दल सहानुभूती असेल तर भारताने यापुढेही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये”, अशी भूमिका आसावरी जगदाळे यांनी मांडली.
अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त
दरम्यान शिवसेनेकडून (ठाकरे) ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन आज राज्यभरात केले जात आहे. या आंदोलनाची माहिती देत असताना शिवसेनेचे (ठाकरे) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मी आजचा सामना वेळ मिळाल्यास पाहणार, असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या २६ लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या २६ लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.