निसार मोहिमेनंतर, इस्रो ६,५०० किलो वजनाचा अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करणार

0

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. इस्रोने अलीकडेच जगातील सर्वात महागडा उपग्रह निसार यशस्वीरित्या लॉन्च केल्यानंतर भारत आता एक विशाल अमेरिकन कम्युनिकेशन उपग्रह ब्लॉक-२ ब्लूबर्ड हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आणि विशेष म्हणजे, हा उपग्रह थेट स्मार्टफोनशी जोडला जाईल. वजनाने ६,५०० किलो असलेला ब्लूबर्ड उपग्रह इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट एलव्हीएम-३- एम५ द्वारे श्रीहरीकोटावरून आगामी काही महिन्यांत प्रक्षेपित केला जाणार आहे. हा उपग्रह सप्टेंबरपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.ब्लॉक-२ ब्लूबर्ड हा एक प्रगत अमेरिकन उपग्रह आहे, जो थेट मोबाइल फोन डेटा आणि कॉल कनेक्टिव्हिटीसाठी तयार करण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे जमिनीवर किंवा हवेत, अगदी दुर्गम भागातसुद्धा थेट कनेक्टिव्हिटी मिळू शकते.

अहवालानुसार, या उपग्रहामध्ये ६४.३८ चौरस मीटरचा कम्युनिकेशन अ‍ॅरे आहे, जो थेट मोबाइल फोनशी जोडता येतो. हा उपग्रह 3GPP मानक फ्रिक्वेन्सीवर कार्य करतो, म्हणजेच तो 3G, 4G आणि 5G सारख्या सध्या वापरल्या जाणाऱ्या मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानासोबत सुसंगत आहे. या उपग्रहाची खासियत म्हणजे तो थेट उपग्रहातून स्मार्टफोनवर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करतो, त्यासाठी कोणत्याही बेस टर्मिनलची आवश्यकता नसते. उपग्रहातील कम्युनिकेशन अ‍ॅरेद्वारे वापरकर्ते सुमारे १२ एमबीपीएस वेगाने डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात. यामुळे जगभरातील टेलिकॉम कंपन्यांना एकत्रितपणे व्हॉइस कॉल, डेटा सेवा आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधा सहजपणे पुरवता येणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech