पुणे : कुर्डूतील घटनेबाबत मी ट्विट करुन मी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे, अशा शब्दांमध्ये कुर्डू गावात अवैध उत्खननावेळी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातील हडपसर येथे जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर आपलं मत व्यक्त केले. माझं चांगलं काम दाखविण्यापेक्षा नको ते दाखवतात, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या होत्या. यावेळी त्याचा ग्रामस्थांशी वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. याबाबत आज माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, कुर्डूतील घटनेबाबत मी व्टिट करुन मी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे.