छावा कार्यकर्त्यांना मारहाण : सूरज चव्हाणांना पदाचा राजीनामा देण्याचे अजित पवारांचे आदेश

0

लातूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.

दरम्यान काल झालेल्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांनी एक व्हिडीओ शेअर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे अजित पवार यांनी चव्हाण यांना मुंबईला बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला होता. यावेळी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले होते. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणानंतर सोशल मीडियासह राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech