देहराडून : वर्ष २०४७ मध्ये विकसित भारताची कल्पना तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा लहान व पूर्वेकडील राज्यांचा समावेशक विकास होईल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या राज्यांच्या विकासासाठी पूर्ण बांधिलकीने कार्य करत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले. याच कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली की, २०२७ मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून उभा राहील.
अमित शहा रुद्रपूरमध्ये आयोजित उत्तराखंड गुंतवणूक महोत्सव २०२५ मध्ये बोलत होते. या कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्ते ५ योजनांचे लोकार्पण आणि १३ योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “मी जेव्हा जेव्हा उत्तराखंडमध्ये येतो, तेव्हा एका नवीन ऊर्जा घेऊन परत जातो. कारण येथे आल्यानंतर चार धामांमध्ये वास करणाऱ्या सर्व देवी-देवतांचे आणि अध्यात्माचा जागर करणाऱ्या संतांचे आशीर्वाद मिळतात. एका बाजूला पर्वत शिखरे संपूर्ण जगाला अध्यात्मिक उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला येथे वास्तव्यास असलेले साधूसंत भारतीय संस्कृतीला अधिक बळकट करत आहेत. येथील नद्या देशाच्या निम्म्या भागाला सिंचन व पिण्याच्या पाण्याचा स्रोत पुरवतात.”
शहा पुढे म्हणाले की, उत्तराखंड सरकारने औद्योगिक विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखले आहे. रोजगाराला स्थायित्व दिले आहे. नितीमध्ये पारदर्शकता, अंमलबजावणीत गती आणि दृष्टीकोनात दूरदृष्टी असलेली धोरणं राबवली आहेत. यामुळे उत्तराखंडच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा उभा राहिला आहे.
तसेच, त्यांनी हेही स्पष्ट केले की उत्तराखंडच्या राज्याच्या लढ्यात काँग्रेसने आंदोलनकर्त्यांवर अत्याचार केले, पण तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तराखंडसह झारखंड आणि छत्तीसगड यांची स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा केली. अटलजींनी तीन राज्ये तयार केली आणि आता मोदी सरकार ही राज्ये विकासाच्या नव्या शिखरांवर घेऊन जाण्यासाठी काम करत आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची विशेष स्तुती केली. त्यांनी सांगितले की, “मैदानी भागांमध्ये उद्योग सुरू करणे सोपे असते, पण उत्तराखंडसारख्या लहान राज्यात, जेथे भौगोलिक अडचणी मोठ्या आहेत, तिथे १ लाख कोटींची गुंतवणूक मिळवणे आणि ८१ हजारांहून अधिक रोजगार निर्माण करणे ही अतिशय कठीण बाब आहे, पण धामी आणि त्यांच्या कार्यसंघाने हे शक्य करून दाखवले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.”